भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिकाऱ्यांनी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.पालिकेतील विविध विभागांत अनेक अधिकारी एकाच पदावर १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे जवळच्याच कंत्राटदारांशी साटेलोटे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप विरकर यांनी केला आहे. यात पालिकेचे नुकसान होऊन शहराचा विकास निकृष्ट दर्जाचा होऊ लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकाच कामाच्या वेगवेगळ्या प्रकारे निविदा काढून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा कारभार त्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असतानाही मर्जीतील कंत्राटदारांना अधिक दराने कंत्राट देण्याचे कटकारस्थान केले जात असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर काही महिन्यांतच संक्रांत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातील बहुतांशी अधिका-यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होऊन मंत्रालयात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पारदर्शक कारभारामुळे त्या तक्रारींवर अद्याप कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने ते अधिकारी मोकाट सुटू लागल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभारात सतत वाढ होत असून त्यांच्या कारभाराचे वाभाडे गतवर्षी विधानमंडळ अधिवेशनात हक्कभंगाच्या माध्यमातून काढण्यात आले आहेत.तरी देखील आयुक्त डॉ. नरेश गीते अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आपला पारदर्शक कारभार चालवित असल्याचा संशय विरकर यांनी व्यक्त केला आहे. एकाच मलईदार पदावर वर्षानुवर्षे राहिल्याने इतर लायक अधिकाऱ्यांना हेतूपुरस्सर पदोन्नतीपासुन रोखले जाते. यामुळे शहराचा विकास चांगला न होता भ्रष्ट मार्गातुन विकासाचे तीनतेरा वाजविले जाते. याचे सोयरसुतक सत्ताधाऱ्यांना नसल्याने अशा अधिकाऱ्यांना ते सबळ पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यातच काही अधिकारी झालेल्या बदल्या सत्ताधाय््राांमार्फत रद्द करुन पुन्हा पुर्वीच्या पदावर रुजू होतात. अशा प्रकारांना विभागप्रमुखांचे पाठबळ लाभत असल्याने पुन्हा-पुन्हा तेच अधिकारी त्यांच्या दावणीला बांधले जातात. यामुळे विभागप्रमुखांचा भ्रष्ट कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निर्विवाद चालविला जातो. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागांत कराव्यात. अन्यथा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरकर यांनी आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.
पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 9:29 PM