ठाणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. दुपारनंतर घराघरांतील, सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतील. त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण जिल्ह्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने त्यातून वाट वाढत विसर्जन पार पाडावे लागणार आहे.यंदा अनंत चतुर्दशीला मंगळावर आल्याने बाप्पांच्या विसर्जनाचा उत्साह अधिक तरीही त्या वातावरणाला भावपूर्णतेची किनार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजार १५ बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. यात ७११ सार्वजनिक, तर ३० हजार ३०४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. विसर्जनासाठी शहरांतील विसर्जनघाटही सज्ज आहेत. विसर्जन सुरळीत पार पाडावे, यासाठी पालिका प्रशासन आणि पोलीस सज्ज आहेत. परिमंडळ-१ अंतर्गत सार्वजनिक १०३, घरगुती ५४९०, परिमंडळ-२ अंतर्गत १३६ सार्वजनिक, २५६५ घरगुती, परिमंडळ-३ अंतर्गत १७२ सार्वजनिक, १० हजार ५५६ घरगुती, परिमंडळ-४ अंतर्गत १३८ सार्वजनिक, ६२४५ घरगुती, तर परिमंडळ-५ अंतर्गत १६२ सार्वजनिक व ५४४८ घरगुती बाप्पांचे विसर्जन होईल. ठाण्यात ११ हजार २०३ बाप्पांना निरोप दिला जाईल. नागरिकांना हा सोहळा पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.बुजवण्याचे आदेश देऊनही सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम -मागील काही दिवस पावसाने पुन्हा ठाण्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे तात्पुरता मुलामा लावलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ते दोन दिवसांत बुजवण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. असे असले तरी बाप्पांचे विसर्जन खड्ड्यांतूनच होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीवरून सध्या शहरात ३२० च्या आसपास खड्डे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या दुप्पट असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.उच्च न्यायालयाने सर्वच महापालिकांना शहरात पडणाºया रस्त्यांच्या मुद्यांवरून सुनावले असतानादेखील ठाणे महापालिका हद्दीत आजही विविध भागांत खड्डे आहेत. पावसाने तर पालिकेचा खड्डे बुजवण्याचा दावा फोल ठरवला आहे. मागील काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पुन्हा रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र झाले आहे.पालिकेने आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यातील खड्ड्यांची संख्या ४५१ असल्याचे सांगितले होते. घोडबंदर, कॅसल मिल, माजिवडा, कापूरबावडी, बाळकुम, ढोकाळी, कळवा, लोकमान्यनगर, वागळेचा काही भाग आदीसह इतर भागांतही खड्डेच खड्डे असे चित्र आहे.दरम्यान, पावसाची संततधार कमी झाल्यानंतर तातडीने खड्डे भरण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर गेल्या दोन सुट्यांच्या दिवशीही ते भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, प्रभाग समिती स्तरावरील सर्व अधिकाºयांनी सुटीच्या दिवशीही प्रभागातच राहण्याचे आदेश देऊन गणेशोत्सव विसर्जनाच्या आधी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाºयांना दिले आहेत.परंतु, तरीदेखील शहरात पालिकेच्याच आकडेवारीनुसार ३२० खड्डे भरण्याचे अजून शिल्लक आहेत. ते विसर्जनाच्या दिवशी भरले जातील, असा दावाही पालिकेने केला आहे. असे असले तरी त्यांची संख्या दुप्पट असण्याची शक्यताही पालिकेनेच वर्तवली आहे. त्यामुळे यंदाही बाप्पांचे विसर्जन खड्ड्यांतूनच होणार असे दिसत आहे.
खड्ड्यांतूनच ३१ हजार मूर्तींचे विसर्जन , जिल्ह्यात सर्वत्र विसर्जन घाटांवर सुसज्ज व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:49 AM