मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दीड दिवसांच्या ६ हजार ७६३ गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले. यापैकी कृत्रिम तलावात केवळ ५७४ मूर्तीचे विसर्जन झाले असल्याने महापालिका आणि राजकारण्यांनी कृत्रिम तलावाची संख्या वाढवण्यासह जनजागृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
महापालिकेने रविवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाची आकडेवारी दिली आहे. त्यात तलाव, खाडी व समुद्रात विसर्जन केलेल्या मूर्तीची संख्या ६ हजार २१६ इतकी आहे. तर चार कृत्रिम तलावातील संख्या केवळ ५४७ इतकी आहे. शनिवारी एकूण ६ हजार ७६३ गणेश मूर्तीचे विसर्जन केले गेले.
कोरोना संसर्गाच्या नियमांचे अनेक ठिकाणी बंधन झुगारून विना मास्क लोक विसर्जनासाठी जात होते. शिवार उद्यान येथील पालिका तलावात तर नगरसेवक संजय थेराडे यांना तराफावरून नेण्यात येऊन मूर्ती विसर्जन करू दिल्याने भाविकांनी नगरसेवकांना पालिका खास वागणूक देत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.