डोंबिवली : शहरातील मानाच्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे संस्थेच्या प्रथेप्रमाणे एकादशीला सोमवारी विसर्जन झाले. त्यानिमित्त आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कलारंग ढोल ताशा पथकाच्या ८० वादकांनी वादन करून वातावरणात चैतन्य आणले होेते.
गणेश मंदिर संस्थान, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी आरती केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी युवकांनी श्री गणेश मंदिर, फडके रोडमार्गे टिळक पथ, आंध्र बँकमार्गे जोशी हायस्कूल नजीकचा चौक ते देढीया निवासमार्गे गणेश मंदिर अशा मार्गाने रथ ओढून मिरवणूक काढली. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. यंदाही संस्थानाच्या आवारातील विहिरीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव सचिन कटके यांनी दिली.
यावेळी संस्थानाचे अध्यक्ष राहुल दामले, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस व कर्मचारी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडल्याचे कटके यांनी सांगितले. दरम्यान, ढोल पथकाने केलेले सादरीकरण सगळ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले.