मीरारोड- मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दिड दिवसांच्या ७ हजार ८७८ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने विसर्जनाची तर पोलिसांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.
महापालिकेने तयार केलेल्या ३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव, खाडी, समुद्रात महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली आहे . शिवाय मुर्ती स्वीकृती केंद्र उभारली आहे. आमदार गीता जैन , महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त मारुती गायकवाड व रवी पवार आदींनी शहरातील ठराविक विसर्जन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.
प्रभाग समिती १ मध्ये ३०२, समिती २ मध्ये ७९६, समिती ३ मध्ये १६७३ , समिती ४ मध्ये २७३८, समिती ५ मध्ये ८२ तर प्रभाग समिती ६ मध्ये २२८७ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी कार्यरत होते.
सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे . निर्माल्य , अन्य कचरा आदी [पाण्यात न टाकता किनाऱ्यावरील कलश मध्ये टाकण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . तर ध्वनी मर्यादेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. विसर्जन मुळे सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या भाईंदर रेल्वे स्थानक पर्यंतच्या बस बंद करण्यात आल्याने मोठ्या संख्येने लोकांचे हाल झाले . लोकांना नाहक पायपीट करावी लागली वा रिक्षाचे जास्त भाडे मोजावे लागले .