प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव काळात आवाजाची पातळी कमी झाली होती. या वर्षी मात्र आवाज पुन्हा वाढला असून ध्वनी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत गणेशमुर्तींचे विसर्जन करण्ायात आले. राम मारुती रोड या निवासी परिसरात रात्री १०. ४५ च्या सुमारास आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत गाठली. ढोलताशा, बेंजो, डीजे आणि अन्य ध्वनी यंत्रणेच्या आवाजाचा गोंधळ रात्री दहा वाजल्यानंतरही असल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासक डाॅ. महेश बेडेकर यांनी नोंदविले.
ध्वनीप्रदूषणाबाबत न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. परंतू दीड दिवस आणि त्यानंतर रविवारी झालेल्या पाच दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी ठाणे शहरात कमी झालेला आवाज पुन्हा वाढला. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले परंतू गणेशोत्सव काळात आवाजाची वाढलेली पातळी पाहता ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी झालेले ध्वनीप्रदूषण हे दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेने अधिक असल्याची माहिती डॉ. बेडेकर यांनी दिली. दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी देखील ९० - ९५ डेसिबल पर्यंत आवाजाची पातळी गेली तर रविवारी चक्क आवाजाच्या पातळीने शंभरी गाठली. यंदा दीड आणि पाच दिवसांच्या गणेशोत्सव काळात विशेषत: विसर्जन मिरवणूकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. डॉ. बेडेकर यांनी विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावरील आवाजाच्या पातळीची नोंद केली. दोन्ही दिवशी आवाजाची पातळी ही ८५,९०,९५,१०० या डेसिबलच्या घरात असल्याचे आढळून आले. विसर्जन मिरवणूकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नोंदी
राम मारुती रोड : रात्री ८.३० - ९० ते ९५ डेसिबल रात्री १०.४५ : ९५ ते १०० डेसिबल रात्री १२ : ९५ डेसिबलपाचपाखाडी : रात्री ८.४५ : ८५ ते ९० डेसिबलवर्तकनगर : रात्री ९ : ७५ ते ८५ डेसिबलहिरानंदानी इस्टेट : रात्री ७.३० : ८५ ते ९० डेसिबल