कल्याण : डोंबिवलीतील खंबाळपाडा मार्गावर ललित संघवी या मार्बल व्यापाºयाचा खड्ड्याने बळी घेतल्यानंतरही शहरातील खड्डे कायम आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर हा अपघात घडला असला, तरी केडीएमसीने त्यातून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. वारंवार केली जाणारी डागडुजी कुचकामी ठरत असल्याने मंगळवारी अनंत चतुर्दशीला खड्ड्यांतूनच विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत.पावसामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. यात अपघात होऊन काही वाहनचालक, प्रवासी जायबंदीही झाले आहेत. केडीएमसीने वर्षभराकरिता खड्डे बुजवण्यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी ११ कंत्राटदार नेमले आहेत. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील, हा प्रशासनाचा दावा वस्तुस्थिती पाहता पुरता फोल ठरला आहे. खड्डे बुजवण्याची केली जाणारी कामे ही कुचकामी ठरत असल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.२५ आॅगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळीही खड्डे होते. महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही खड्ड्यांमध्ये खडी भरून ते भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती रस्त्यांवर इतरत्र पसरल्याने त्रासदायकही ठरत आहे. २९ आॅगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने आणखी खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु, त्यानंतर ३० आॅगस्टनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले ऊनही पडले होते. या कालावधीत तातडीने रस्त्यांमधील खड्डे भरण्याची कामे होणे आवश्यक होते. मात्र, तशी तत्परता बांधकाम विभागाने दाखवलेली नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश चौक आणि महत्त्वाचे रस्ते खड्ड्यांत गेले आहेत.केडीएमसीच्या स्थायी समितीच्या बैठकीत गणेशोत्सव तयारीचा आढावा घेण्यात आला होता. त्या वेळेस विशेष करून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना सर्व पक्षांच्या सदस्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. परंतु, मुसळधार पडलेल्या पावसात रस्त्यांची चाळण झाली. काँक्रिटच्या रस्त्यावरील पेव्हरब्लॉक उखडले गेले आहेत. काँक्रिटच्या रस्त्यांना जोडणाºया डांबरी रस्त्याच्या सुरुवातीला खड्डे पडले आहेत. रस्त्यांची लेव्हलही बिघडली आहे.
विसर्जन मिरवणुका निघणार खड्ड्यांतूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:34 AM