ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाला सुरवात झाल्याने त्या कामात महापालिकेचे अधिकारी देखील जुंपले आहेत. परंतु याचा गैरफायदा घेत ठाण्याच्या विविध भागात पुन्हा अनाधिकृत इमारतींचे इमले उभे राहत असल्याची गंभीर बाब आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पुराव्या सहित महापालिका आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिली आहे. केवळ एवढेच नाही तर एका राजकीय पक्षाच्या नेत्याने पालिकेच्या आरक्षित भुखंडावर कंटेनर शाखा सुरु करुन तो भुखंड हडपण्याचा प्रताप केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत खास करुन कळवा, मुंब्रा दिवा या भागात अनाधिकृत इमारतींचे इमले उभे राहत असल्याची बाब नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील चांगलीच गाजली होती. त्यानंतर ही बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर नऊ प्रभाग समितीमधून अशा प्रकारची कारवाई सुरु झाल्याचे दिसून आले. महिनाभर चालणारी ही कारवाई मागील काही दिवसापासून थांबल्याचे दिसत आहे. त्यातही कळवा, विटावा भागात अनाधिकृत इमारतींवर कारवाई झाली खरी मात्र काही इमारतींकडे कानाडोळा केल्याने या इमारती आजही या भागात तग धरुन आहेत. त्यावर महापालिका केव्हा कारवाई करणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. किंबहुना काही इमारतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून आले.
दरम्यान मागील आठवड्यापासून कारवाईची मोहिम थंडावली असून उलट बंद असलेले अनधिकृत इमारतींवर इमले चढवण्यास सुरुवात झाली आहे. अशा सर्वच प्रभागातील बांधकामांच्या फोटोसह आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली.एकीकडे अनधिकृत बांधकामे सुरू असताना घोडबंदर मार्गावरील धर्मवीर नगर येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर थेट कंटेनर शाखा उभारण्याचा प्रताप काही राजकीय नेत्यांनी केल्याचेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. हा भुखंड बालउद्यान, पोलीस ठाणे तसेच ओपन जीमसाठी आरक्षीत आहे. या भुखंडावर २०२०- २१ साली केळकर यांच्या प्रयत्नाने संरक्षक पत्रे लावण्यात आले. तसेच या भुखंडावर अतिक्रमण करणाºयांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. असे असतानाही सर्व्हेक्षण सुरू होताच २४ जानेवारीला या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर ध्वज चढवत, फोटो लावत या कंटेनरचे रुपांतर शाखेत करण्यात आले. त्यामुळे ही शाखा हटवून भुखंड ताब्यात घ्यावा अशी मागणीही केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.