धीरज परब मीरा रोड : मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे. मासेमारी सोडून किनाºयावर परतावे लागले, तर काहींना जाताच न आल्याने खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ आदी खर्च अंगावर पडलाच. शिवाय, मासेमारीच करता न आल्याने मच्छीमारांचे दुहेरी नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक आदी किनारपट्टी परिसरात सुमारे ७५० मासेमारी बोटी आहेत. मासेमारी हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारांना सध्या मासेमारीचा चांगला हंगाम मिळाला होता. ४ डिसेंबरला हवामान खात्याने ओखी चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा देत पुढील ७२ तास समुद्र खवळलेला राहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत बोलावण्याचा इशारा दिला होता. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तशी माहिती पोलीस, पालिकेला दिली होती.अनेक मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. तर, अनेक बोटी जायच्या तयारीत होत्या. धोक्याच्या इशाºयानंतरही खोल समुद्रात गेलेल्या बोटी ४ डिसेंबरला सायंकाळपर्यंत सुखरूप किनारी आल्या. तर, अनेक बोटी वादळाच्या इशाºयामुळे समुद्रात गेल्याच नाहीत. पोलीस, महसूल व मत्स्य विभागाने ओखी वादळाचा इशारा मिळताच दिवसरात्र बोटींशी संपर्क साधून त्यांना माघारी फिरायला लावल्याने बोटींचे नुकसान वा जीवितहानी झाली नाही. परंतु, मासेमारी बुडाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना इंधन, बर्फ, किराणा आदीसाठी मोठा खर्च प्रत्येक बोटीला येतो. शिवाय, खलाशांना त्यांचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे हा सर्व खर्च भरून काढत त्यावर उत्पन्न मिळवायचे म्हटले की, मासेमारी केली पाहिजे व मासेही मिळाले पाहिजेत. परंतु, ओखी वादळामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटींना मासेमारी न करताच मागे फिरावे लागले. त्यामुळे मासे तर मिळाले नाहीतच, शिवाय इंधन, बर्फ, किराणा, खलाशांचा पगार यांचा खर्चही वाया गेला. तर, मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीने निघालेल्या बोटींनाही अशाच प्रकारे नुकसान सोसावे लागले आहे.
ओखी वादळाचा परिणाम : उत्तनच्या मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:30 AM