ठाणे : सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या श्वानांमुळे शहरातील वातावरण आणि मानवी आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात तर भटके श्वान मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात. अशा अनेक गोष्टींचा त्रास होत आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टीने भटक्या श्वानांनाही जगण्याचा अधिकार असल्याने शहरातील भटक्या श्वानांची समस्या दूर करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून श्वान दत्तक योजना सुरु करावी, अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्येकडे केली आहे.
भटक्या श्वानांनी दंश केल्याने हजारो लोक वर्षाला जखमी होत असतात, अशी वेगवेगळ्या शहरांची आकडेवारी सांगते. त्यातील गरीब-मध्यमवर्गीय लोक सरकारी व पालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार - इंजेक्शन घेण्यासाठी जातात. तर खासगी रूग्णालयातही श्वान दंशाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्न वाढत्या शहरीकरणामुळे महानगरात भटक्या श्वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक वैतागले असून देखील त्यांच्यासाठी अनेक प्राणीमित्र चांगले काम करीत आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जखमी आजारी भटक्या श्वानांसाठी शासकीय पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये, खासगी पाळीव प्राण्यांचे दवाखाने, श्वान निबिर्जीकरण केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करणो व नसबंदीबाबत मार्ग काढणो शक्य असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
परंतु असे होताना दिसत नसून अनेक नगरपालिका, महापालिका यांचे याबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाय केले पाहिजेत. भटक्या श्वानांच्या निबिर्जीकरण शस्त्रक्रियेनंतर त्यांचे लसीकरण व त्यांना ठणठणीत बरे करून मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी श्वान दत्तक योजना राबविली जावी. तसेच याबाबत जनतेत जनजागृती केल्यास भटक्या श्वानांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा दावा त्यांनी केला आहे. या योजनेतून भटके श्वान दत्तक दिल्यामुळे रस्त्यावरून हळूहळू हे श्वान कमी होतील. जेणोकरून नागरिकांना होणारा उपद्रवही कमी होईल. असेही त्यांनी सांगितले.