पंकज पाटील
बदलापूर: प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करूनही अनेक विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाईलाही सुरूवात केली आहे. गेल्या दीड महिन्यात बदलापूरात ५७४ विक्रेत्यांवर कारवाई करून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण,वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नुसार १ जुलै २०२२ पासून संपूर्ण देशात एकल वापर प्लास्टिक (सिंगल युज) प्लास्टिक वस्तू प्रतिबंधित आहेत.
या प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने आयोजित व्यापारी व व्यवसायिकांच्या बैठकीत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले होते.नगर परिषदेच्या शोध पथकामार्फत बाजारपेठ, प्लास्टिक वितरक, दुकाने फेरीवाले, व्यापारी आस्थापना याठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकबाबत तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार जुलै महिन्यापासून नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. २२ ऑगस्ट पर्यंत नगर परिषदेच्या पथकाने ५७४ विक्रेत्यांवर कारवाई करून १६३ किलो प्लास्टिक जप्त केले असून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. बदलापुरात आजही मोठ्या प्रमाणात अनेक दुकानदार प्लास्टिकचा वापर करीत आहे. हा वापर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र कारवाई दरम्यान काही कर्मचारी हे दुकानदारानंबरोबर तडजोडीचा मार्ग अवलंबत असल्यामुळे प्लास्टिक वापरावरील बंदीची मोहीम अडचणीत येत आहे. त्यामुळे तडजोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आता कारवाईची गरज व्यक्त होत आहे.