ठाणे : पेनमंडला हा चित्रशैलीचा एक प्रकार असला तरीही मनःशांतता मिळवण्याच्या अनेकविध पर्यायांमध्ये पेनमंडला चित्रशैलीला महत्त्व आहे. चित्रशैलीचा हा अनोखा प्रकार साकारताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे ठरते. यातील अतिसूक्ष्म जालवर्क करताना चित्ताची एकाग्रता अनुभवता येते, नकळतपणे सुखद क्षणांच्या चिंतनात आपण व्यस्त होतो, असे प्रतिपादन "लेटस् गेट क्राफ्टीन" या कार्यक्रमात पेनक्राफ्ट आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी सामंत-देसाई यांनी व्यक्त केले. ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधनामहाविद्यालयाच्या विद्यार्थी समितीच्या वतीने योग्य सामाजिक अंतर राखण्याच्या या काळात 'विविध कलागुणांचे अनुसरण' या उद्देशाने *"द क्विंटेट ऑफ आर्टिस्ट्री"*( कलात्मक पंचकडी ) या नावाने पाचदिवसीय कलात्मक वेबिनारचे आयोजन दि.२८ जुलै २०२० ते १ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आले आहे. या कलात्मक वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ जुलै,२०२० रोजी कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी विद्यार्थी नचिकेत जोशी आणि राकेश गुप्ते यांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयात शिकत असताना विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रेरणादायी व्याख्यानांमुळे जीवनाला निश्चित, सकारात्मक दिशा मिळाली,आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ज्ञान देणारे उपक्रम माझ्या भविष्यातील वाटचालीसाठी साहाय्यभूत ठरले, या शब्दांत प्रायोगिक शिक्षण प्रयोगशाळा या संस्थेत संचालकाच्या भूमिकेत कार्यरत असणाऱ्या नचिकेत जोशी यांनी आपली भावना व्यक्त केली. तर, महाविद्यालयात प्रवेश घेताना एका रिक्त कॕनव्हाससारखे असणारे माझे व्यक्तिमत्त्व महाविद्यालयात मिळणाऱ्या संस्कारांमुळे खऱ्या अर्थाने बहुआयामी झाले. तसेच, शिक्षण घेत असताना ज्ञानसंपन्न, अष्टपैलू शिक्षक लाभल्यामुळे यशाची गुरूकील्ली मला सहज गवसली, असे मनोगत आय.एल आणि एफ.एस फायनॕन्शिअल सर्विसेस लिमिटेड या कंपनीत वित्त विभागात वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर कार्यरत राकेश गुप्ते यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात "लेटस् गेट क्राफ्टीन" या कार्यक्रमात पेनक्राफ्ट आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी सामंत-देसाई यांनी 'पेनमंडला' या विशिष्ट कलेविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांची संस्था मधुबनी चित्रशैली, वारली चित्रशैली , गोंड चित्रशैली, वन स्ट्रोक आर्ट, सुलेखन इ. अनेक कलांशी निगडीत कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन करते. आजच्या सत्रात त्यांनी जेल पेन, ब्रश पेनच्या साहाय्याने साकारली जाणारी 'पेनमंडला चित्रशैली' प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने शिक्षक-विद्यार्थ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमात जुई सावंत या विद्यार्थिनीने सूत्रसंचालकाची भूमिका निभावली. या पाचदिवसीय वेबिनारमध्ये व्हिडिओ मेकिंग, व्यक्तिमत्त्व सौंदर्य, पाककला, मनोरंजन, गाणे, अभिनय, नृत्य अशा अनेक कलागुणांनी भरलेल्या सत्रांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या फेसबूक व यु-ट्युब चॕनलच्या माध्यमातून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक तसेच ईच्छूकांनी घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी समितीकडून करण्यात येत आहे.
मनःशांतता मिळवण्याच्या अनेकविध पर्यायांमध्ये पेनमंडला चित्रशैलीला महत्त्व : पल्लवी सामंत - देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 2:20 PM
"कलात्मक पंचकडी"(Quintet of Artistry) महोत्सवाचा दुसरा दिवस पार पडला.
ठळक मुद्दे "कलात्मक पंचकडी"(Quintet of Artistry) महोत्सवाचा दुसरा दिवसमनःशांतता मिळवण्याच्या अनेकविध पर्यायांमध्ये पेनमंडला चित्रशैलीला महत्त्व पेनमंडला चित्रशैलीचा एक प्रकार आहे, - पल्लवी देसाई