भिवंडी : शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी केलेले खोदकाम आणि खड्डे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत रस्त्यांचे महापालिकेकडून डांबरीकरण सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कंत्राटदार डांबरीकरण करताना आवश्यक दर्जाकडे दुर्लक्ष करत आहे. मनपाच्या बांधकाम विभाग आणि अन्य जबाबदार अधिकाऱ्यांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. ज्या रस्त्यांवर कंत्राटदार डांबरीकरणाचे काम करत आहे, तेथे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या निकृष्ट कामाकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष कसे जात नाही, याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. निकृष्ट कामांमुळे मनपाचे नुकसान होणार असून यासाठी जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाºयांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामेही योग्य पद्धतीने व नियमानुसारच व्हायला हवीत, अशा सूचना संबंधित कंत्राटदारासह मनपाच्या बांधकाम विभागातील सर्वच अभियंत्यांना दिल्या आहेत. तरीही, अंतर्गत रस्त्यांवर होणाºया डांबरीकरणाच्या कामांमध्ये हयगय होत असेल, तर अशा बेजबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार, अभियंते यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- डॉ. प्रवीण आष्टीकर,आयुक्त, भिवंडी महापालिका