अजित मांडकेठाणे : ठाणे परिवहन सेवेत मागील काही महिन्यांत नव्या बसेस आल्याने सुधारणा होत असली तरी जुन्या बसेस दुरुस्त करण्यासाठी परिवहनकडे निधी उपलब्ध नसल्याने किरकोळ कारणासह मोठ्या दुरुस्तीच्या कामाच्या १००हून अधिक बसेस वागळे आगारात उभ्या आहेत. असे असले तरी खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या बसेसमुळे ठाणेकरांना सध्यातरी काही अंशी का होईना परिवहनच्या सेवेतून चांगला प्रवास करण्यास मिळत आहे. परंतु अवैध वाहतूक करणाºया खाजगी बसेसचा बंदोबस्त केल्यास परिवहनचे उत्पन्न वाढून त्याचा फायदा बसेस दुरुस्त करण्यासाठी होऊ शकतो अशी आशा ठाणेकर नागरिकांना आहे.
ठाणे परिवहनची सेवा १९८९च्या सुमारास झाली. सुरुवातीला २५ बसेसद्वारे सुरू झालेल्या परिवहनच्या ताफ्यात आता ३१७ बसेस तसेच खाजगी ठेकेदाराच्या १७८ बसेस मिळून एकूण सुमारे ४९५ बसेस आहेत. पण प्रत्यक्षात आजघडीला २८० ते २९० बसेसच धावत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या पाहता त्या तुलेनत बसेसची संख्या फारच कमी आहे. ठाणे परिवहन सेवेचे १०१ मार्ग असून या मार्गांची लांबी १९८ किमी आहे. दरम्यान परिवहनच्या ताफ्यात येत्या काळात महिलांसाठी ५० तेजस्विनी बसेस सामील होणार आहेत; त्याचप्रमाणे इथेनॉलवर धावणाºया १०० आणि इलेक्ट्रिक १०० अशा एकूण २५० बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.ठाणेकरांचा प्रवास पूर्वीपेक्षा काही अंशी का होईना सुखकर झाल्याचे दिसत आहे. पूर्वी ठाणे सॅटीसवर प्रवाशांना अर्धा ते एक तास बससाठी ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु आता ही वेळ मर्यादा कमी झाली आहे. तसेच परिवहनने उत्पन्नवाढीसाठी काही नवे मार्गदेखील सुरू केले आहेत. काही बंद झालेले जुने मार्गदेखील पुन्हा सुरू केले आहेत.
ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकूलित बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर १८ वातानुकूलित बसेस धावतात; त्याव्यतिरिक्त या मार्गावर साध्या बसेसही धावत आहेत. ठाणे ते भिवंडी, ठाणे ते नालासोपारा या नव्याने सुरू केलेल्या मार्गांवरील बससेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे; शिवाय मीरा रोडला जाणा-या बसमध्ये प्रवाशांची गर्दी अधिक असते. सध्या ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न हे दिवसाला २८ ते ३० लाखांच्या घरात गेले आहे.ठाणेकर प्रवाशांच्या समस्या तशा सुटलेल्या नाहीत. परंतु पूर्वीपेक्षा काही अंशी का होईना थोड्याफार प्रमाणात ठाणेकरांचा प्रवास सुखकर होताना दिसत आहे.- अशोक सोनावले, टीएमटी प्रवासी
ठाणे परिवहन सेवेने किमान सकाळ आणि संध्याकाळी महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी. यापूर्वी ही सेवा सुरू होती. तशी सेवा पुन्हा सुरू झाल्यास महिलांना निश्चितच फायदा होऊ शकेल.- प्रमिला साळुंखे, टीएमटी प्रवासी
ठाणेकरांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात महिलांसाठी ‘तेजस्विनी’ त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर धावणाºया बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याचा फायदादेखील ठाणेकर प्रवाशांना होणार आहे.- संदीप माळवी, व्यवस्थापक,ठाणे परिवहन सेवा