अंबरनाथ: बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी मुख्य जलवाहिनी आज पहाटे काटई नाक्याजवळ फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची मोठी नासाडी झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान काटई नाका येथील हेदूटणे गावाजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. पाण्याला एवढा प्रवाह होता की वीस फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने तात्काळ जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दिवसभर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शनिवारी दिवसभरासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.
बारवी धरणातून ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २ मोठ्या जलवाहिन्या पाईपलाईन रोडने शीळफाट्याकडे गेल्या आहेत. ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत अक्षरशः हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. सध्या दिवसभरासाठी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.