अंबरनाथ : मागील काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याच्या विरोधात मनसेने महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला आहे. अंबरनाथ शहरात संध्याकाळी खंडित झालेला विद्युत पुरवठा थेट पहाटे सुरळीत होत आहे.त्यानंतर पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली दिवसा सुद्धा वीज पुरवठा खंडित केला जात होता. आधीच ऑक्टोबर हिट सुरू असताना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा शहरातील नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांना होत असलेल्या या त्रासाचा जाब विचारण्यासाठी आज अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पश्चिमेच्या महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांसह उपस्थित महिलांनी महावितरणच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला.यावेळी मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे, अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, शहर संघटक स्वप्नील बागुल, शहर उपाध्यक्ष बबलू खान, उल्हासनगरचे माजी शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार उपस्थित होते.