भिवंडी : दोन लाखाची लाच मागितल्या प्रकरणी भिवंडी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस नाईकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद केशव निकम असे दोन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस नाईकाचे नाव असून तो भिवंडी नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. निकम हा शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना त्याने १६ ऑगस्ट रोजी एका महिलेने तक्रारदारा विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे असे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी सुरुवातीला १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर मिलिंद निकम याने तक्रारदारासोबत तडजोड करून त्याच दिवशी ५ लाख रुपये स्वीकारले होते. पाच लाख रुपये दिल्यानंतरही मिलिंद निकम याने तक्रारदाराकडून आणखी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी २४ ऑगस्ट रोजी ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
याबाबत ठाणे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता चौकशीत मिलिंद निकम याने लाच घेतल्याचे व लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर ठाणे लाचलुत विभाग प्रतिबंधक विभागाने निकम याच्या विरोधात शुक्रवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.