भिवंडी: पगार थकलेल्या कामगाराने मालकाकडे थकीत पगाराची मागणी केली असता मालकाने दहा दिवसानंतर थकीत पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची व वादातून कामगाराने मालकावर चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी पूर्णा गावातील अरिहंत कंपाउंड येथे घडली आहे.
राकेश रामनरेश सिंग वय ४५ वर्ष रा. वालीव पालघर असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. राकेश सिंग यांचे भिवंडीतील पूर्णा गावातील अरिहंत कंपाउंड येथे पीव्हीसी कंपनी असून या कंपनीत अमित सोमय प्रजापती वय २३ वर्ष हा कामगार काम करत होता. त्याने कंपनीत केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी हा बुधवारी कंपनीत गेला होता यावेळी कंपनी मालकाने कामगाराला दहा दिवसांची मुदत देऊन पैसे देण्याचे कबूल केले यावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने मालकाला शिवीगाळ करून मारहाण केली व पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या चाकूने मालकाच्या छातीवर चाकू खुपसून कंपनी मालक राकेश सिंग यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी कंपनीत काम करणारे कामगार शिवम रायकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अमित प्रजापती याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.नारपोली पोलिसांनी आरोपी अमित प्रजापती यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार करीत आहेत.