भिवंडी : शहरात सध्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा देखील पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगार्यांकडे मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुरता दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
भिवंडी शहरातील कल्याण रोड वरील नवी वस्ती परिसरात असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून शहरातील इतर अनेक ठिकाणी देखील अशाच प्रकारे कचऱ्याचे ढिग साचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सध्या संपुष्टात आल्याने मनपा प्रशासनावर अधिकाऱ्यांचाच वरचष्मा आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने स्थानिक नगरसेवक देखील शहरातील कचऱ्याच्या समस्यांकडे फारसे डोळसपणे पाहत नसून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नागरिक ही कचऱ्याच्या तक्रारी घेऊन स्थानिक नगरसेवकांकडे फारसे जात नाहीत. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने मनपाचे अधिकारी देखील कचऱ्याच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून स्वच्छतेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे.