नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: समाजातील तळागाळातील सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहचून आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आशा वर्कर्स यांना दिवाळी सानुग्रह अनुदान न दिल्याने मनपा प्रशासना विरोधात आंदोलन करत दिवाळी सानुग्रह अनुदान व इतर मागण्या प्रलंबित राहिल्याने या महिलांनी सोमवारी महानगर पालिका मुख्यालय प्रवेशद्वारा समोर चटणी भाकरी खाऊन अनोखे आंदोलन केले. महिनाभरा पूर्वी या महिलांनी काळी दिवाळी साजरी करीत महानगरपालिके समोर भाऊबीज ओवाळणी आंदोलन केले होते.
भिवंडीत महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल १४२ हुन अधिक आशा वर्कर कार्यरत असून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या आपली सेवा बजावत आहेत.या आशा वर्कर महिलांना सानुग्रह अनुदान मिळावे या मागणी करता २१ ऑक्टोंबर रोजी या महिलांनी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर भाऊबीज ओवाळणी करून काळी दिवाळी साजरी केली होती.त्यावेळी या महिलांच्या शिष्टमंडळाला मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी यांनी सानुग्रह अनुदान देण्याबाबत आयुक्तांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते.परंतु त्यानंतर ही आश्वासन न पाळल्यामुळे या महिलांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली असून, सोमवारी भिवंडी शहरातील सर्व आशा वर्कर महिलांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आपल्या सोबत आणलेली चटणी भाकर खाऊ अनोख्याचे आंदोलन केले आहे.
अत्यंत तुटपुंज्या मानधनावर या महिला काम करत असताना या महिलांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून देय असलेले पैसे सुद्धा महापालिका प्रशासनाने अडवून ठेवले आहेत.त्यामुळेच या महिलांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगत या आंदोलनानंतर ही प्रशासन जागे झाले नाही तर या पुढे पालिका मुख्यालय प्रवेश द्वारा समोर उग्र असे थाळी नाद आंदोलन केलं जाईल असा इशारा भगवान दवणे यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"