भिवंडी : शहर व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वास्तव्य करीत असलेल्या आदिवासी समाज आज ही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असून त्यांच्या विविध मूलभूत मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी तहसीलदार कार्यालय येथे सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला व बांधव सहभागी झाले होते.
तालुक्यतील ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी पाड्यांमध्ये जोडरस्ते व अंतर्गत रस्ते तात्काळ मंजूर करावेत. आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी मुबलक व पिण्यायोग्य पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था करावी,ज्या आदिवासी पाड्यांमध्ये विज नाही अशा गाव पाड्यांना तात्काळ विजेची व्यवस्था करुन आदिवासींना मोफत विज मिटर द्यावेत, ग्रामपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील ज्या कुटुंबियांच्या मालमत्तांना घरपट्टी आकारलेली नाही.
अशा ठिकाणी कर आकारणी करुन तात्काळ घरपट्टी द्यावी, तालुक्यातील मंजुर वन दावेदारांची ७/१२ सदरी नोंद करुन तात्काळ वन दावेदारांना ७/१२ वाटप करावा, प्रलंबित असलेल्या वनदाव्यांचा शोध घेऊन तात्काळ निपटारा करावा, जातीचे दाखले, आधार कार्ड, वंचित राहिलेल्या आदिवासी कुटुंबीयांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा यांसह अनेक मागण्यांचे निवेदन श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, तालुका प्रमुख आशा वाघे, भिवंडी शहर प्रमुख गुरुनाथ वाघे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार अधिक पाटील यांना देऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी दशरथ भालके,सुनील लोणे,सागर देसक,जया पारधी,अंकुश जाधव,अमोल मुकणे, राजेश चन्ने,नारायण जोशी,दुष्यंत घायवाट आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.तर तहसीलदार कार्यालया समोर दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.