भिवंडी : शहरातील नारपोली परिसरातील विठ्ठल नगर भागात असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत कोसळली आहे. यावेळी या मजल्यावर शाळा सुरू होती. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जीवितहाणी झाली नाही. यावेळी, स्थानिकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी पालकांनी शाळा प्रशासनाबरोबरच मनपा प्रशासनाचाही तीव्र निषेध केला.
शहरातील नारपोली रतन सिनेमा परिसरात घर नंबर २८३ ही खैरूनिस्सा सिद्दीकी यांच्या मालकीची तळ अधिक दोन मजली २५ वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने असून एका बाजूला रहिवासी राहतात, तर एका बाजूस दोन मजल्यावर भिवंडी इंग्लिश मेडीयम स्कूल व भिवंडी उर्दू शाळा सुरू होती. सोमवारी दुपारी शाळा सुरू असताना एक वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील शाळेच्या एका बाजूची संपूर्ण भिंत नजीकच्या गल्लीत कोसळली. त्यावेळी पाऊस सुरू असल्याने गल्लीत कोणीही नव्हते. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले.
ही इमारतीस धोकादायक असल्याने ती रिकामी करण्याचे आदेश बजावून इमारतीचा वापर न करण्याबाबतच्या सूचना इमारतीवर लिहल्या असून या दुर्घटने नंतर तात्काळ इमारत रिकामी करून ती तोडण्याची कारवाई सुरू केली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली आहे.इमारत धोकादायक असल्याने दोन वेळा नोटीस बजावली परंतु इमारत मालक यांनी थातूरमातूर दुरुस्ती करून इमारत वापर परवाना मिळवत होता.आज दुर्घटन घडल्याने इमारत मालकाने केलेली दुरुस्ती कुचकामी होती हे स्पष्ट झाले आहे.पाऊस सुरू असल्यामुळे या सदैव वर्दळीच्या गल्लीत कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली,शाळा सुरू असतानाच इमारतींचे छत पडले असते तर मोठी जीवितहानी झाली असती.काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या डोक्यात छताचा पंखा कोसळल्याची घटना घडली होती.पालिकेने वेळीच कारवाई करायला हवी होती अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक अल्ताफ अन्सारी यांनी दिले आहे.