मीरारोड - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मीरा भाईंदर मधील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले . तर वसई हद्दीत महामार्ग पाण्यात गेल्याने वसई च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वरसावे पासूनच महामार्ग व घोडबंदर मार्गावर रांगा लागल्या होत्या .
पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते . अनेकांच्या घरात व दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले . काही रस्ते पाण्यात गेले . यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते . तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असला तरी कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले .
वसईच्या हद्दीतील मुंबई - अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली होती . त्यामुळे वसई - गुजरातच्या दिशेने वरसावे नाका मार्गे जाणारी वाहने अडकून पडली . घोडबंदर मार्गावर चेणे पर्यंत तर नवीन वरसावे पूल आणि खालच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचे हाल झाले .