मीरारोड - फटाक्यांमुळे मीरा भाईंदरमध्ये आग लागण्याच्या सुमारे २५ पेक्षा जास्त घटना घडल्या असून एका घटनेत तर घरातील सामानासह दोन लाखांचे नोटांचे बंडल जाळून खाक झाले आहे. तर शहरात मध्यरात्री २ ते अडीज वाजेपर्यंत फटाके बेकायदा फोडले जात होते. सर्वत्र फटाक्यांचा घातक धूर पसरला होता तर आवाजाने लोकांच्या कानठळ्या बसल्या.
मीरा भाईंदरमध्ये मंगळवारच्या रात्री फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. नया नगरमधील अस्मिता रिजन्सीमध्ये फिरोज शेख यांच्या घरात पेटते रॉकेट रात्री १०.२० च्या सुमारास शिरून घराला आग लागली. त्यावेळी घरात कोणी नव्हते. आगीत घरातील सामान जाळून खाक झाले. कपाटातील रोख ठेवलेले २ लाखांचे बंडल सुद्धा जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागल्याचे कळताच घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी शेख कुटुंबियांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
शहरातील विविध २३ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. फटाक्यांमुळे आगी लागत असल्याने ६ अग्निशमन केंद्रांसह आणखी ६ ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने व जवान तैनात केले आहेत असे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. या शिवाय शहरातील गोडदेव नाका येथे एका गळ्यात मोठी आग लागली. गीता नगरच्या गीता पुष्प इमारतीत राहणारे आशिष शेट्टी यांच्या घरात सुद्धा भीषण आग लागली. आगीत सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले असून घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट, पलंग, कपडे, वायरिंग आदी जाळून गेली. फटाक्यांमुळे आगी लागून होणारे नुकसान आणि जीवाला धोका पाहता लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.
शहरात फटाक्यांमुळे प्रचंड घातक असे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण झाले आहे. फटाक्यांच्या घातक धुराचे आवरण सर्वत्र पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालय, शांतता झो परिसरात सुद्धा सर्वत्र फटाके फोडले गेले. पहाटे २ ते अडीच वाजेपर्यंत शहरात फटाके फुटत होते. फटाक्यांच्या आवाजाने कानठळ्या बसल्याचा संताप लोकांनी व्यक्त केला. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणाच्या वाढत्या घटनांनी पोलीस आणि पालिकेने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.