- अनिकेत घमंडी
डोंबिवली : दातांचे आरोग्य जपणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. जंकफूडमुळे लहान मुले, तरुणांचे दात किडल्याचे दिसून येते. दातांची वेळच्या वेळी स्वच्छता, निगा न राखल्यास नकली दात बसवण्याची वेळ येऊ शकते. ते टाळण्यासाठी दात वेळच्या वेळी स्वच्छ करावेत, जमल्यास दिवसातून दोन-तीन वेळा दात स्वच्छ घासावेत, असेही आवाहन दंतविकार तज्ज्ञ करतात.
वर्षातून एकदा तपासणी आवश्यक
दातांचे आरोग्य राखण्यासाठी वर्षातून किमान एकदा दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी, तसेच दातांची स्वच्छता करून घेणे आवश्यक आहे.
...तर नकली दातांची गरजच नाही
- दातांचे विकार झाल्यास त्या वेदना असह्य असतात. दाताला कीड लागणे, क्वॅव्हिटी यापासून जपले पाहिजे.
- दातांची काळजी घेतल्यास कीड लागणे, दात काढणे व कृत्रिम किंवा नकली दात बसवणे टाळता येते.
दातांची स्वच्छताही महत्त्वाची
दातांची स्वच्छता केल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणे टाळता येते. तसेच आपले हास्यही टिकवता येते.
दातांचे सर्व उपचार महागडे तसेच खूप वेळ घेणाऱ्या असतात. आपल्याला दीर्घकाळ दातांचे आरोग्य पाहिजे असेल तर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या कराव्या लागतात. वेळेत उपचार केल्यामुळे दातांच्या वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते. - डॉ. मंदार आंजर्लेकर, दंतविकार तज्ज्ञ
दातांचा त्रास हाताबाहेर जाईपर्यंत कोणी तपासणी करत नाही. तसे न केल्यामुळे वेळ निघून जाण्याची शक्यता असते. स्वतःचे आरोग्य राखणे ही स्वतःची जबाबदारी असते. त्यात दातांची सुरक्षा हा मोठा अविभाज्य भाग असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचे दुष्परिणाम सर्व शरीरावर होतात. : डॉ. श्वेता आंजर्लेकर, दंतविकार तज्ज्ञ
वेळीच उपचार करणे ठरते फायदेशीर
दातांवरील उपचार महागडे असल्यामुळे सर्वसामान्यांना ते करणे शक्य होत नाही. तसेच दातांच्या उपचाराचा खर्च शक्यतो विम्यात समाविष्ट होत नाही. त्यामुळे एकूणच दातांकडे दुर्लक्ष होते. परंतु, डॉक्टरकडे वेळेवर जाऊन उपचार केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. दात अधिक गंभीर होण्यापेक्षा वाचवता येऊ शकतो.