ठाणे : डांबरी रस्ता खचण्याच्या घटना ठाण्याच्या विविध भागात घडत असतांनाच आता पाचपाखाडी भागात एक वर्षसुध्दा न झालेल्या सिमेंट रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी, महापालिकेच्या कामाबाबत मात्र पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यात कोपरी असेल किंवा सावरकरनगर, लोकमान्य नगर या भागात रस्ते खचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावरुन महापालिकेच्या कामावर टिका देखील झाली होती. त्यानंतर बुधवारी पाचपाखाडी भागात संत ज्ञानेश्वर भागातील सिमेंटचा रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. याठिकाणी साहित्य घेऊन एक ट्रक आला होता. त्यातून साहित्या उतरवत असतांना अचानक ट्रकच्या मागच्या चाकाखालील रस्ता खाली खचल्याचे दिसून आले. त्यामुळे आता महापालिकेच्या कामावर पुन्हा एकदा टिका होऊ लागली आहे.
या घटनेची माहिती भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी लागलीच पालिकेला दिली. त्यानंतर पालिकेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. एक वर्षापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आल्याचा दावा नारायण पवार यांनी केला आहे. परंतु अवघ्या एका वर्षात रस्ता कसा खचला याचा जाब आता पालिकेला विचारला जाणार आहे. त्यातही जेव्हा या रस्त्याचे काम सुरु होते, त्याचवेळेस पालिकेच्या अधिकाºयांना या रस्त्याचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे महापालिकेच्या अधिकाºयांनी मात्र हा रस्ता दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता खचला असावा असेही सांगितले जात आहे. परंतु बुधवारी येथे गच्च भरुन साहित्य ट्रकमध्ये आणले गेले होते. हा ट्रक पुढे मागे होत असतांनाच हा रस्ता खचल्याचे पालिकेने सांगितले आहे. परंतु आता दुरुस्तीचे काम केले जात असून लवकरच रस्ता खुला केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.