भिवंडी: भिवंडी शहरातील कासार आळी व ब्राह्मण आळी परिसरात असलेल्या शाळा व महाविद्यालय परिसरात अनेक तरुण व वाहन चालक आपली वाहने वेगाने चालवत असल्याने या भागात भविष्यात वाहनांच्या धडकेत विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी मनसेचे कासार आळी विभाग अध्यक्ष कुणाल आहिरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कासार आळी ब्राम्हण आळी येथील रस्त्यावर गतिरोधक बनविण्याची मागणी मनसेचे ठाणगे आळी विभाग अध्यक्ष तुषार खारेकर,भिवंडी शहर उपाध्यक्ष ऍड सिद्धार्थ खाने,कुमार पुजारी आदी पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आपआपल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.मात्र वर्षभरापासून भिवंडी मनपाने मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असून वेळोवेळी मनसैनिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत असा आरोप आहिरे यांनी केला आहे.
या परिसरात शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात असून रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असून मनसेनेरीतसर मागणी करूनही मनपा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. भविष्यात अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. मनसेच्या या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासना विरोधात मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात उतरली असून येत्या आठवडाभरात ब्राह्मण आळी व कासार आळी परिसरातील रस्त्यावर गतिरोधक लावले नाही तर मनसे महापालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेचे विभाग प्रमुख कुणाल आहीरे यांनी दिली आहे.