सुरेश लोखंडे, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीपरीक्षा १८ फेब्रुवारी राेजी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. त्यासाठी ५ वी व ८ वीचे तब्बल ४० हजार ८८० परीक्षार्थी असून त्यांच्यासाठी २१८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले, असे ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी लाेकमतला सांगितले.
या परीक्षा सर्व केंद्रांवर सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, निरीक्षक, पर्यवेक्षेक आदींना खास येथील एन केटी सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. तर आज तालुका पातळीवरील मनुष्यबळाची बैठक घेऊन परीक्षा केंद्रांवरील साेयी सुविधांची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी पथक तैनात केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १२३ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये तबबल २४ हजार ५०० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ८ वीच्या परीक्षेला जिल्ह्याभरात १६ हजार ५८१ परीक्षार्थी आहेत. त्यांची आसन व्यवस्था ९५ परीक्षा केंद्रांवर निश्चित करण्या आलेली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान काेणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आलेला आहे.