अजित मांडके, ठाणे : "शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघे जाणकार नेते आहेत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कोणालाही सांगता येणार नाही किंवा ते देखील सांगणार नाहीत". परंतु त्यांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
आज विरोधी पक्षाला विचारतच घेतले जात नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी श्रेय घेत आहेत. त्यात त्यांनी उगाच शरद पवार यांचे नाव घेतले. ते आम्हाला अडकवायला गेले होते. पण आता ते त्यात अडकले आहेत. भुजबळ यांनी त्यांच्या पूर्वश्रमिच्या नेत्याबद्दल काळजी दाखवली. त्यात चुकीचे काय आहे? असा सवाल ही आव्हाड यांनी केला. मुळात त्यांना माहिती आहे की शरद पवार म्हणजे जादूची कांडी आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. बारामतीत रविवारी झालेल्या अजित पवार यांच्या सभेत ७० टक्के खुर्च्या रिकामी होत्या. जर बारामतीत ही परिस्थिती असेल तर इतरत्र काय असेल असे म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. "सत्ताधाऱ्यांनी आधी धर्मात, जातीत भांडणे लावून पाहिली, पैसे वाटून पहिले, पण धर्म आणि पैसा चालत नाही हे त्यांना लोकसभा निवडणुकीतून समजले असेल" असे ही आव्हाड म्हणाले.
"जिथे राम चालत गेले त्या सर्व मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचा लोकसभेत पराभव झाला आहे". जर सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही आता लवकरच सत्तेत येणार आहोत. त्यानंतर आम्ही आरक्षण देऊ असा दावाही त्यांनी केला. आरक्षण हा केंद्र सरकारचा अख्त्यारीतील विषय आहे, त्यामुळे यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. या सरकारला कॅग अहवालातील ५४ हजार कोटी दिसत नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या सर्व योजना फक्त कागदावर असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. मुळात अर्थसंकल्पात सरकारने काय केले, हेच कॅगला समजत नाही. महाराष्ट्रला उत्तर हवे आहे की ५० हजार कोटी कुठे गेले. हा लाखो करोडोचा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.