सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गायी, म्हशी, बैल आदी पशूंना पावसाळ्यात विविध आजार हाेण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी या जनावरांना ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून तब्बल चार लाख ६६ हजार ४५० मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्ह्याभरातील या जनावरांना साथींच्या आजारांची लागण पावसाळ्यात हाेण्याची भीती आहे. या प्रादुर्भावामुळे जनावरांचे मृत्यू होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, लम्पी चर्म रोग, लाळ खुरकत रोग, पीपीआर आदी आजार, साथीचे आजार प्रतिबंधक लस टोचण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी १ एप्रिल पासून लसीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत तब्बल चार लाख ६६ हजार ४५० लसींचा वापर करण्यात आला आहे. लसीकरण अभियानात पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनी भाग घेतला होता.
या लसीकरण अभियानात जिल्ह्यात घटसर्प आणि फऱ्या ४० हजार ५० लसीकरण, घटसर्पच्या ५६ हजार लसीकरण, फऱ्या २८ हजार लसीकरण, लम्पी चर्म रोग ६३ हजार ६०० लसीकरण करण्यात आले. तर आंत्रविषाराचे ३९ हजार ५०० लसीकरण लाळ खुरकत रोग प्रतिबंधात्मक एक लाख ७७ हजार २०० जनावसांचे लसीकरण, पीपीआर प्रतिबंधात्मकतेचे ६२ हजार १०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्य पातळीवर झालेल्या विसाव्या पशुगणनेच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दाेन लाख ३९ हजार २८१ पशुधन आहे. यांपैकी एक लाख ७५ हजार ९४७ गाय आणि म्हैस, तर ६३ हजार ३३४ शेळ्या आणि मेंढ्या आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण आणि अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, लम्पी चर्म रोग, लाळ खुरकत आदी साथीचे आजार हाेण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील जनावरांचे हे प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली २१ पशुधन विकास अधिकारी, ३३ पशुधन पर्यवेक्षक आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे.