ठाणे: ठाण्यातील श्रीरंग सोसायटीतील दत्त महाराज यांचे मंदिर सांभाळणाऱ्या चाळके कुटूंबीयांनी आपल्याच घरातील् ८६ वर्षीय कमल चाळके यांना मारहाण केल्याचा तसेच दीराच्या सुनेने हाताला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती राबोडी पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्यातील श्रीरंग सोसायटीतील दत्त बिल्डींगमध्ये हे सुप्रसिद्ध दत्त मंदिर आहे. या ठिकाणी नगरसेवकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक हाय प्रोफाईल अभिनेते आणि राजकारणी यांनी भेट देऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले आहे. मात्र, याच मंदिरात राहणाऱ्या चाळके कुटूंबीयांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कमल चाळके यांनी ६ एप्रिल २०२४ रोजी राबोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. याप्रकरणी रमेश चाळके, सुरेश चाळके, चिंगू चव्हाण, चंपा चाळके, सुजाता अवधूत चाळके यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच कुटूंबीयांनी कुटुंबातील प्रमुख कमल चाळके यांना ५ एप्रिल २०२४ रोजी जमीन व मालमत्तेच्या वादातून तिच्या मुलाच्या अनुपस्थित मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास आग्रह धरला.
तिला या पाचही जणांनी घेरुन बेदम मारहाण तसेच धक्काबुक्की करून खाली पाडून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिला श्वास घेण्यास त्रास झाला तरी देखील धमकाऊन बेदम मारहाण केली. त्याआधी कमल यांच्या मोठया दीराची सून सुजाता चाळके हिने त्यांच्याशी वाद घालून त्यांचे दोन्ही हात पकडून गॅसच्या जळत्या शेगडीजवळ भाजायला सुरुवात केली. तिने तिचे हात सोडविण्याचा प्रयत्न करीत असतांना तिने त्यांना किचनच्या भिंतीवर ढकल्यामुळे त्या कमरेवर पडल्या. त्यानंतर त्यांचे मोठे दीर सुरेश, रमेश चाळके आणि नणंद चिंगू चव्हाण, भाऊ चंपा चाळके यांनीही त्यांचे तोंड दाबून त्यांना जिन्यावरुन फरफटत नेले.
प्रॉपर्टी नावावर करुन देण्यासाठी अंगठा दे, असे धमकावत असतांनाच त्यांचा नातू गौरव त्याठिकाणी आला. त्यानंतर या सर्वांनी ढकलून मारहाण केल्याचेही कमल यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. गाैरव यानेच कमल यांना आता उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी आता चाैकशी करण्यात येत असल्याचे राबाेडी पाेलिसांनी सांगितले.