ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहनाची डिझेल टाकी फूटल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कॅडबरी ब्रिज घडली. टाकी फूटल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात डिझेल पसरल्याने वाहतूक कोंडी झाली. तर वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरती पाणी मारल्यानंतर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माती टाकून रस्ता वाहतुकीस मोकळा केला आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील कॅडबरी ब्रिजवरून चालक उमेश बांगर हा कापूरबावडी येथून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहन घेऊन भांडुप येथे निघाला होता. त्याचदरम्यान सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास त्या गाडीची डिझेल टाकी फूटल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात डिझेल पडले. त्यामुळे वाहनांची कोंडी होण्यास सुरुवात झाली अशी माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह व अग्निशमन दलाचे जवान २ फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्या रस्त्यावरती पाण्याचा मार सुरू केला.त्यानंतर त्या रस्त्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माती पसरवली आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तो रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.