ठाणे : कला, साहित्याला वाहिलेले उपक्रम भरवून त्यातून झालेला आर्थिक लाभ समाजोपयोगासाठी दान करणारे खूपच कमी आहेत. ठाण्याचे सुप्रसिद्ध नर्तक श्रेयस देसाई त्या मोजक्यांपैकीच एक आहेत. २९ एप्रिल या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्ताने 'मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा २९ एप्रिल २०२२, रात्री ८ वाजता, काशिनाथ घाणेकर सभाग्रुह, ठाणे येथे संपन्न होणार आहे. नृत्यगुरु डॉ.मंजिरी देव यांचा सन्मान आणि गुरुपुजन केले जाणार आहे. मेघना जाधव, मेघा संपत, जय सिंग, सुकन्या काळण या मान्यवराच्या उपस्थितीत हा दिवस साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम 'मिरियार्ड आर्ट' आणि 'मुद्रा आर्ट’ अकँडमीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्यातील १२ डान्स ग्रुप कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी, इंडियन कंटेंप्ररी, लावणी, बॉलीलावणी, सेमी क्लासिकल आणि बालिवुड असे विविध १२ नृत्य प्रकार सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमातून जमा झालेला निधी ठाण्यातील 'दीव्यप्रभा' या ४२ मुलींची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. नृत्याच्या माध्यमातून अशा प्रकारचा समाजोपयोगी उपक्रम घेणारी 'मिरियार्ड आर्ट' ही पहिलीच संस्था आहे.
आपल्या या अनोख्या उपक्रमाविषयी श्रेयस सांगतात की, "आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्ताने नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्था, महाविद्यालये विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र एकाच छताखाली विविध प्रकारातील नृत्याचे सादरीकरण फारसं होताना दिसत नाही. मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस'या उपक्रामांतर्गत नृत्याच्या विविध प्रकारांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. तसेच त्यातून मिळणारा नफा आम्ही दीव्यप्रभा या संस्थेला देणार आहोत.' 'मिरियार्ड या शब्दाचा अर्थ अपंरपार, अनंत असा आहे. नृत्याच्या साधनेला अंत नाही. त्यामुळे अशा अनंत कलेतील विविध प्रकार प्रेक्षकांना पाहाता यावेत, यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसा निमित्तानं ,'मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य' दिवस ठाण्यात घेत आहोत असं त्यांनी सांगितले.