सुरेश लोखंडे, ठाणे : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सदिच्छा दिल्या असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते याच्या हस्ते या उमेदवारांना जिल्हा परिषदेत निवड पत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
"कुशल काम असो, रोजगार असो किंवा उद्योजकता कामात उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्याची गरज असते. त्यास अनुसरून तरुणांनी आत्मसात केलेले कौशल्य अधोरेखित करण्यासाठी आणि काळानुसार ते अधिक कुशल होण्यासाठी प्रयत्नशील असणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या जागतिक युवा कौशल्य दिनची थीम शांतता आणि विकासासाठी युवकांची कौशल्य अशी असून यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा", असे मार्गदर्शन डॉ. सातपुते यांनी केले. त्यावेळी ठाणे आयटीआय चे प्राचार्य स्मिता माने, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विजय टिकोले, गंगाराम कर्पे, तसेच गटनिर्देक तृषांत मोटगरे, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार राजेश सोनवणे, निदेशक शर्वरी दुर्गुळे तसेच शिकाऊ उमेदवारी करिता निवड झालेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.