ठाणे :
कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या आजारापासून नागरीकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने आरोग्य विभागाने बुस्टर डोसही देण्यास सुरवात केली आहे. परंतु मागील दीड वर्षाचा विचार केल्यास १६ जानेवारी २०२१ ते २३ जुलै २०२२ पर्यंत ५ लाख ४७ हजार ५२० जणांनी बुस्टर डोस घेतला असून उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ९ टक्केच जिल्हावासियांनीच डोस घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून अनेक निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. अशातच आरोग्य यंत्रणेकडून देखील मोकळा श्वास घेण्यात येत आहे. असे असले तरी, दुसरीकडे मात्र, कोरोना या आजारापासून आपले संरक्षण व्हावे, यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी धाव घेण्यात येत होती. मात्र कोरोना कमी होताच लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या डोस नंतर बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी, आजही पहिल्या व दुसऱ्या डोस नंतर बुस्टर डोसघेण्याऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सहा महापलिका, दोन नगरपालिका, ग्रामीण भाग असे मिळून ८३ लाख १५ हजार ८६१ इतके लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७० लाख ७० हजार ४९४ जणांनी पहिला तर, ६३ लाख १०७ जननी दुसरा डोस घेतला आहे. त्यानुसार पहिल्या डोसची टक्केवारी हि ८५.०२ इतकी असून ७५.७६ टक्के इतकी आहे. तर, दुसरीकडे आतापर्यंत ५ लाख ४७ हजार ५२० जिल्हावासियांनी बुस्टर डोस घेतला असून उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ९ टक्केच जिल्हावासियांनीच डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हावासियांनी बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनकडून करण्यात येत आहे.
कोविड लस अमृत मोहोत्सावांतर्गत मोफत बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा आरोग्य विभाग यांनी देखील हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शासकीय आरोग्य केंद्रामार्फत मोफत बुस्टर डोस देण्यात सुरुवत केली आहे.