सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गोवरच्या रुग्णांचा ताप वाढलेला असतानाच त्यात आता अंबरनाथ व खडवली परिसरात विचित्र तापाचे रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, तीन गोवरसदृश रुग्णांचे स्वॅब हापकिनच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करता येणार आहेत. गोवर उपचारासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालये सज्ज केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.
जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण भागात गोवर रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्यात विचित्र तापाच्या तीन रुग्णांचा शोध घेण्यात आला. खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील दोन बालकांसह अंबरनाथ येथील एका रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहेत. या गोवरसदृश तापाची तपासणी झाल्यानंतर त्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी गोवर रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ११० रुग्ण आढळले आहेत. यात ग्रामीणमधील भिवंडीच्या सहा रुग्णांसह कल्याणमधील पाच आणि अंबरनाथमध्ये दोन गोवर रुग्ण आहेत.
गोवरवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची खास बैठक घेऊन औषधोपचारावर चर्चा झाली. गोवर लस न घेतलेल्या बालकांचा आशा स्वयंसेविकांकडून शोध घेतला जात आहे. २४ महिन्यांत बालकांना दोन डोस दिले जात आहेत. यात पहिला डोस नऊ महिन्यांनंतर आणि दुसरा डोस १६ महिन्यांनंतर देऊन गोवरवर मात करण्याचे नियोजनही जिल्ह्यात केले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत गोवर रुग्णांवरील उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"