मुंबई - जे कोपरी पाचपाखाडीचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात मी याआधीही उठाव केला होता आणि आताही उठाव करतोय. ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाचपाखाडीतून झाली होती त्याचा अंतही कोपरी पाचपाखडीत करणार आहोत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात निवडणुकीत रणशिंग फुंकतोय. याबाबत संजय राऊत यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. जर पक्षाने आदेश दिला तर एकनाथ शिंदेंना कोपरी पाचपाखाडीतून मात देऊ असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपशहरप्रमुख प्रदीप शेंडगे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. प्रदीप शेंडगे म्हणाले की, मी जेव्हा पक्षफुटी झाली तेव्हा सर्वात आधी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ मी ठाण्यात बॅनर लावला. माझा बॅनर एक तासांत उतरवण्यात आला. बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत त्या सांगू शकत नाही. मी संजय राऊतांना भेटलोय, लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्याशिवाय ठाण्याचे नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शहरप्रमुख यांनाही पत्र लिहिणार आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मात्र निर्णय पक्षाचे श्रेष्ठी देतील. ते जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात आम्ही काही करणार नाही. पक्षाचे काम जोमाने करू. लोकसभा निवडणुकीनंतर तिथलं वातावरण बदललं आहे. आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का असा दबाव विभागातील कार्यकर्त्यांवर आहे. कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही प्रदीप शेंडगे यांनी केला.
दरम्यान, माझ्यावरही दबाव येऊ शकतो, मात्र मी या दबावाला भीक घालत नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहोत. त्यामुळे असल्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही असा इशाराही ठाकरे गटाचे ठाणे उपशहरप्रमुख प्रदीप शेंडगे यांनी दिला आहे.
कोपरी पाचपाखाडी जागेवर लक्ष
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून आलेत तिथे त्यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेदेखील इच्छुक असल्याचं बोलले जाते. त्याशिवाय आदित्य ठाकरे यांच्याही नावाची चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यात आता या नेत्याने पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या मतदारसंघावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे.