अजित मांडके ,ठाणे : "मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतवतो, मी आश्वासन देत नाही, मी काम करतो" अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली. "आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करुन मंजुर करुन ती कामे पूर्ण करतो" असेही ते म्हणाले.
सोमवारी आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही टीका केला. २००९ मध्ये पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते. "आज ते सत्यात उतरविले आहे, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे उदघाटन होईल असे सांगतांनाच मी कोणत्याही कामाचे क्रेडीट घेत नाही. माझे काम बोलते असेही ते म्हणाले. पारसिक चौपाटीसह येथील रस्ता, ९० फीट रस्ता, जलकुंभ देखील कळव्यात उभे राहिले आहेत. मुंब्य्रात दोन जलकुंभ असून उर्वरीत जागांचा शोध सुरु आहे. याशिवाय येथील संप पंपची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. त्यामुळे २००९ मध्ये कळवा, मुंब्रा कसा होता आणि आता तो कसा हे जनताच सांगले तुम्हाला असेही ते म्हणाले. माझ्या मतदार संघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती. प्रस्ताव तयार झाला की तेव्हा एकनाथ शिंदे हे निधी देण्यात कधीही आपला हात आखडता घेत नव्हेत. ते तेव्हांचे एकनाथ शिंदे होते, मात्र आता कसे आहेत, ते माहित नाही. मोठ्या प्रमाणात निधी आणून कळवा, मुंब्य्राचा विकास केला, हा विकास करीत असतांना कधीही स्वप्ने दाखविली नाही, ती सत्यात उतरविण्याचे काम केले. केवळ आश्वासन देण्याचे निधी आणल्याचे बोलत नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांवर त्यांनी टिका केली. तुम्ही कितीही निधी आणा मात्र येथील जनता हुशार आहे, वेळ आल्यावर तेच तुम्हाला उत्तर देतील" असेही ते म्हणाले. आता मला निधी मिळत नाही, मला अर्थनियोजन खात्यातून निधीच नको असेही ते म्हणाले. मला हरविण्यासाठी अजित पवार काय काय करु शकतात, हे यातूनच दिसत असल्याचीही टीका त्यांनी केली.