अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असतांनाच मंगळवारी उध्दव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन याचा जाब विचारला. ज्यांच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली आहे, त्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली.महापालिकेच्या छपत्रती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कारवाई निश्चित करण्यात आली आहे. परंतु मृत्यु पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दिड किलो पेक्षा कमी असल्याचे निर्दशनास आले आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत मंगळवारी उध्दव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा रुग्णालयात धडक दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिरुध्द माळगावकर यांच्या सोबत चर्चा करतांना दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी केली. वारंवार मृत्यु होण्याची कारण काय? रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात, खाजगी संस्थांच्या माध्यमातून रुग्णालयाचा कारभार कशासाठी चालविला जातो, रुग्ण संख्या वाढत असतांना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज असते का? असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत. औषधांचा देखील रुग्णालयात तुटवडा असल्याचे त्यांनी निर्दशनास आणले.
रुग्णालयात मोफत तपासण्या केल्या जात असतील त्याचे फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावणे अपेक्षित आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असेल तर जे चॅरीटीवर रुग्णालये सुरु आहेत, त्यांच्याकडे रुग्णांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा विविध स्वरुपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घेतली जावी, परंतु भविष्यात अशा तक्रारी आल्या तर पक्षाच्या वतीने कठोर पावले उचलली जातील असा इशाराही यावेळी दिघे यांनी दिला.