प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : छोट्या खेड्यातून शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुटुंबातून आलेल्या मला समतावादी शिक्षकांनी घडवले. शिक्षकी पेशामुळे मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे मला कळून चुकले आहेत. इंग्रजी भाषेला जरी वाघिणीचं दूध म्हणत असले तरीही आईचं दूध वाघिणीच्या दूधापेक्षा वरचढ असते. वाचन करा, थोर मोठ्यांचे विचार वाचा, ऐका. सोशल मीडियाच्या अति वापरापासून दूर राहा. सोशल मीडियाचा असा गैरवापर चालू राहिला तर येणारी पिढी संवेदना शून्य होण्याची भीती वाटते आहे असे मत राबोडी फ्रेंड सर्कल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नसीब मुल्ला यांनी व्यक्त केले.
समता विचार प्रसारक संस्थेचा ३३ वा एकलव्य गौरव पुरस्कार समारंभ मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडला. यावेळी ठाणे महानगर पालिकेच्या शाळेतील आणि अन्य शाळेतील १४६ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अभ्यासाबरोबर इतर वाचन करा, नियमित वर्तमानपत्र वाचत जा, असे आवाहन पत्रकार अलका धुपकर यांनी केले. माजी एकलव्य आणि आता कला शिक्षक असणारे दिनेश जाधव आपल्या मनोगतात म्हणाले, परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षणाची कास धरा. पोटाची खळगी भरण्याबरोबरच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करा, सरस्वतीची आराधना करा, लक्ष्मी आपोआप चालत येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीनल उत्तुरकर म्हणाल्या की, शाळेच्या सुरक्षित वातावरणातून तुम्ही जगाच्या मुक्त वातावरणात प्रवेश करत आहात. पुढे नाव कमावण्यासाठी आयुष्याची लढाई लढायची आहे. या लढाईसाठी तुमचा आत्मविश्वास, शिक्षण आणि संविधानाने दिलेली मूल्ये ही तुमची अस्त्रे आहेत. यांच्या संवर्धनासाठी संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणे तुमच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. संयोजक अजय भोसले यांनी प्रस्तावना तर एकलव्य कार्यकर्ता करीना साऊदने सूत्रसंचालन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम आणि संस्थेचे माजी विश्वस्त संजय मंगला गोपाळ यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. मनीषा जोशी आणि जेष्ठ कार्यकर्ते शैलेश मोहिले यांनी स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.