ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम गेट क्रमांक ०३ समोरील गुजराती चाळीमधील घराच्या गॅलरीचा स्लॅब पडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी पहिल्या मजल्यावर अडकलेल्या जनवेश कुशवा (३२), सर्वेश कुशवा (३०), परवेश कुशवा (१८) आणि आनंद कुशवा (१७) या चौघांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली असून घरातील रहिवाश्यांना नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
खारटन रोड, नागसेन नगर येथील गुजराती चाळीत शुक्रवारी मध्यरात्री अचानक काही तरी कोसळल्याचा आवाज झाला. म्हणून पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना त्या चाळीमधील प्रदीप गुप्ता यांच्या मालकीचे तळ अधिक ०१ मजली असलेल्या रुम क्रमांक २८० या घराच्या गॅलरीचा सुमारे १० ते १५ फुट लांबीचा स्लॅब पडल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. यावेळी चार जण पहिल्या मजल्यावर अडकल्याची माहिती पुढे येताच, तात्काळ त्या चौघांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर, धोकादायक स्थितीमध्ये असलेला गॅलरीचा स्लॅब काढून बाजूला केला. याशिवाय त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली असून घरातील रहिवाश्यांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केले. तर, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.