प्रज्ञा म्हात्रेठाणे : जीवंत नागाला पकडून पूजा करण्याच्या घटनांचे प्रमाण यावर्षीही ठाणे शहरात शून्य आढळून आले. या प्रथेला शहरात आळा घालण्यात आला असून प्राणीमित्र संघटनांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आज नागपंचमी निमित्ताने शिवमंदिरात वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने भेटी दिल्या. यावेळी जीवंत नागाची पूजा करण्याच्या घटना आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागाची पूजा केली जाते. यानिमित्ताने शिवमंदिरात पूजेसाठी भक्तांची वर्दळ दिसून येत असते. शहरांमध्ये काही वर्षांपुर्वी जीवंत नागाची पूजा करण्याची प्रथा होती. या प्रथेला प्राणीमित्र संघटनांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे यावर्षीही जीवंत नागाची पूजा करण्याचे प्रमाण शहरात शून्य दिसून आले. तसेच, गारुडीही आढळून आले नसल्याचे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य आणि मानद वन्यजीव रक्षक रोहीत मोहीते यांनी सांगितले. यावेळी शिवमंदिराला संस्थेच्या स्वयंसेवकांनी भेटी दिल्या व अशा घटनांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. सकाळपासून या भेटी सुरू होत्या. जीवंत नागाला पकडून गारुडी त्यांना एक ते दीड महिने उपाशी ठेवले जात, त्यांचे दात काढले जात. उपाशी राहीलेला या नागाला नागपंचमीच्या दिवशी घरोघरी फिरवून या नागाला दूध पाजले जात, दूध हे नागाचे अन्न नाही, त्यामुळे ते पचत नसल्याने ते उलटीद्वारे तो काही दिवसांनी बाहेर काढतो आणि नंतर या नागाचा मृत्यू होतो. ठाणे शहर आणि आसपास अशा घटना आजच्या दिवशी आढळून आलेली नाही असे रोहीतने सांगितले. नाग हा महिन्यातून एकदा खातो, त्यामुळे महिनो नि महिने खाणे पिणे नसेल तर त्याला दूधाच्या जागी कोल्ड्रींक्सही दिले तरी तो पिऊ शकतो अशी खंत प्राणीमिंत्रांनी व्यक्त केली. ठाणे शहरात असे प्रकार गेले काही वर्षे बंद झाल्याबाबत प्राणिमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.