लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवस शहरातील वाहतुक सुरळीत आल्याचे चित्र दिसत असतांनाच पावसाने रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांमुळे या वाहतुक कोंडीत आता आणखीनच भर पडल्याचे दिसून आले आहे. शनिवारी सलग चवथ्या दिवशी मुंबई - नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. माणकोलीला १५ मिनिटांचा जाण्यासाठी लागणारा कालावधी १ तासांचा दिसत होता. खडय़ांमुळे वाहतुक धिम्या गतीने जात होती. त्यात अवजड वाहतुक देखील दुपारच्या सत्रत सुरु असल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वाचीच झोप उडविली आहे. त्यात या पावसाने शहरासह विविध प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील पडलेल्या खडय़ांमुळे वाहनांचा वेग कमी केला आहे. मागील तीन दिवसापासून मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड आदीसह शहराच्या काही भागातही वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी घोडबंदरसह मुंबई नाशिक महामार्ग जाम झाला होता. त्यामुळे घोडबंदरकडे म्हणजेच बोरीवली, मिराभाईंदर या मार्गावर जाण्यासाठी एसटी चालकांनी नकार दिल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शनिवारी देखील सकाळच्या सत्रत घोडबंदरसह मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. साकेत पुल आणि पुढे खारेगाव टोलनाका येथे रस्त्यांना पडलेल्या खडय़ांमुळे ही कोंडी वाढतांना दिसत आहे. परंतु शनिवारी पावसाने उघडीप घेतल्याने संबधींत प्राधिकरणाकडून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे देखील या मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आले.
दुसरीकडे या कोंडीमुळे मानकोली ते थेट तिनहातानाक्यार्पयत वाहनांच्या मोठ मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र दुपारच्या सत्रत दिसून आले. त्यामुळे अवघ्या १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल तासभराचा अवधी जात असल्याचे दिसून आले. त्यात कोंडी फोडण्यासाठी ठिकठिकाणी वाहतुक पोलीस सज्ज असल्याचे दिसून आले.