अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कलरकॅम्प या सब स्टेशन येथील ट्रांसफार्मर ट्रीप झाल्याने बुधवारी ऐन दुपारी तब्बल अडीच तास ठाणे शहरातील काही भागातील बात्तीगुल झाली होती. आधीच वाढत्या उष्णतेच्या बसणाऱ्या झळा, त्यात बत्तीगुल झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते.
ठाण्यातील कलर कॅम्प येथील महा ट्रान्सकोच्या सब स्टेशन मधून महावितरण विभागाला विद्युत पुरवठा होत आहे. नंतर तेथून तो पुरवठा महावितरण आपल्या ग्राहकांना पुरवत असतो. त्यात बुधवारी महा ट्रान्सकोच्या सब स्टेशनमध्ये ट्रिप झाल्याने ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, तलावपाळी, माजिवाडा आणि घोडबंदर रोड परिसरातील काही भागातील बत्तीगुल झाली होती. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यात मागील दोन दिवसापासून ठाणे शहरातील तपमानाचा पार हा ४० अंश सेल्सियाच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच बुधवारी ऐन दुपारी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, लहान मुले देखील उकाड्यामुळे हैराण झाल्याचे दिसून आले.
या संदर्भात महावितरण विभागच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, कलरकॅम्प या सब स्टेशन येथील ट्रांसफार्मर ट्रीप झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल अडीच तास ठाण्यातील बहुतेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरीकांचे हाल झाले होते.