मीरारोड - कोरोना संसर्ग काळात सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेच्या समाज कल्याण विभागाला ईमेलचे वावडे आहे . महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या फेरीवाला सर्वेक्षण यादीवर हरकत वा सूचना केवळ कार्यालयातच आणून देण्याचे नमूद केले आहे .तर २८ जानेवारी हरकत घेण्याची अंतिम मुदत असल्याचे पालिकेने कळवले आहे.
महापालिकेच्या फेरीवाला सर्वेक्षण यादीत ७२२१ फेरीवाल्यांचा समावेश असून आधी महासभेत विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी नंतर मात्र महापौरांच्या अध्यक्षते खाली समिती ठरवली व त्या समिती मध्ये यादीला मंजुरी देऊन ती हरकती सूचना साठी पालिकेने प्रसिद्ध केली . नागरिकांना हरकती सूचना नोंदवण्यासाठी २८ जानेवारी हि अंतिम मुदत असून विशेष म्हणजे हरकत - सूचना पालिका मुख्यालयातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन द्यावी लागत आहे.
एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे दिले जातात व दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग असताना हरकत व सुचणे साठी ईमेल चा पर्याय न दिल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात पालिकेची जाहीर यादी हि तब्बल ३०८ पानांची असून ती प्रभाग निहाय नाही . फेरीवाला बसण्याचे ठिकाण स्पष्ट नाही तर नावे अर्धवट आहेत . अश्या स्थितीत नागरिकाने माहिती घयायचे ठरवले तरी ते अवघड व गुंतागुंतीचे आहे.
हरकती ह्या ईमेल वर न स्विकारता कार्यालयातच येऊन द्यायच्या असे विभागाने बंधन घातले आहे . कारण हरकती साठी ईमेलच दिलेला नाही . ईमेल न देण्या मागे जास्त नागरिकांनी हरकती देऊ नये अशी तर भूमिका नाही ना ? असा प्रश्न केला जात आहे . दरम्यान पालिका जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी सदर बाब विभागाच्या निदर्शनास आणून देऊ असे सांगत हरकतीची मुदत २८ जानेवारी असल्याचे म्हटले आहे.