- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
अहवालात महापालिकेच्या वृक्षा रोपं पासून विविध उपक्रमांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत . पर्यावरण अहवालाची पार्श्वभूमी , शहराची संक्षिप्त ओळख , माझी वसुंधरा अभियान , हवा - पाणी - ध्वनी च्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मूल्यांकन , घनकचरा व्यवस्थापन , आपत्ती व्यवस्थापन , स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत निधी चे विनियोजन , पर्यावरण संवर्धन आणि जागरूकता , पर्यावरणाची ठळक वैशिष्ठ्ये आदी प्रमुख मुद्दे निहाय माहिती अहवालात दिली गेली आहे.
शहराचे तापमान दरवर्षी ६ . ८ डिग्री सेल्सियस ने वाढत असून उन्हाळा अधिक उष्ण व तीव्र होत चालला आहे असे नमूद आहे. व्यावसायिक क्षेत्रातील कचरा ४० हजार ५०६ टन तर घरगुती कचरा २ लाख ८१ हजार ८१६ टन जमा झाला आहे . शहराच्या ६ हजार ४७९ हेक्टर पैकी निवासी क्षेत्रासाठी १५१२ हेक्टर अर्थात २३ . ३४ टक्के इतके क्षेत्र वापरणे प्रस्तावित आहे . तर नाविकास क्षेत्र म्हणून ३७६२ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के ठेवले जाणार आहे.
शहरातील १२ प्रमुख चौकातील हवेची गुणवत्ता तपासली असता ती समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद आहे . घोडबंदर आणि भाईंदर येथील खाड्यांच्या पाण्याची चाचणी केली असता ती सुद्धा गुणवत्ते नुसार योग्य असल्याचे म्हटले आहे . शहरात ध्वनी प्रदूषण मात्र असल्याचे अहवालात मान्य केले असून त्यासाठी १२ ठिकाणी च्या ध्वनी मापनाचे आकडे दिलेले आहेत . त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्या साठी काही उपाय सांगितले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन च्या अनुषंगाने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे . विविध प्रकल्प उभारले आहेत . एका वर्षात ३० हजार ४२२ झाडांची लागवड केली असून आणखी १ हजार वृक्षारोपण प्रस्तावित आहे . इलेक्ट्रिक बस येणार असून स्मशानभूमीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्क्रबर खरेदी केले आहे . हवा शुद्ध करण्यासाठी फिरती वाहने आहेत.
८० पानाचा पर्यावरण अहवाल कल्याणच्या मनू सृष्टी ह्या पर्यावरण सल्लागार यांनी तयार केला आहे . विशेष म्हणजे आमच्या सर्व अपेक्षे प्रमाणे त्यांनी हा अहवाल तयार केला आहे असे खुद्द महापालिका प्रशासनानेच नमूद करत ठेकेदार संस्थेचे कौतुक केले आहे . उपायुक्त संजय शिंदे हे अहवालाचे संपादक तर सहायक आयुक्त योगेश गुणीजन हे प्रकाशक आहेत .