नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दहीहंडी उत्सवात आठ थर लावलेल्या दोन गोविंदा पाथकांमध्ये हंडी फोडण्यावरून झालेल्या वादात पोलिसांनी मध्यस्थी करत पोलिसांनीच हंडी फोडली.शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले अस्लम शेख यांनी हंडी फोडत शहरात राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच शांतता व सुव्यवस्था अबाधित असल्याचे दाखवून दिले.
शहरात शिवसेना शिंदेगट व शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने स्व.आनंद दिघे चौकात गुरुवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दहीहंडीत डायमंड जिमको चाविंद्रा व ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव या दोन गोविंद पथकांनी आठ थरांची सलामी दिल्याने हे दोन संघ हंडी फोडण्यास पात्र ठरले होते.परंतु दहीहंडी फोडण्याचा मान चिठ्ठी काढून देण्याच्या निर्णयाला या दोन्ही संघांनी विरोध दर्शवल्याने त्यांच्यात वाद झाला होता.त्यामुळे हंडी फोडण्यास देखील उशीर झाला होता.अखेर आयोजक सुभाष माने यांनी पारितोषिकाची १ लाख ११ हजार १११ रुपयांची रक्कम दोन्ही संघाना समान वितरित करून गौरव चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला.मात्र हंडी फोडण्याचा मान दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिला.
यावेळी पोलिसांनी मनोरा रचत हि हंडी फोडण्याचा मान भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील असलम शेख या मुस्लिम पोलीस बांधवास देत भिवंडी शहरातील हिंदू मुस्लिम राष्ट्रीय एक्याचे दर्शन घडविले.हि व्हिडीओ क्लिप रात्रीपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.आयोजकां कडून तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हितचिंतकांकडून पोलीस पथकाला रोख चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात आले.पोलिसांच्या वतीने भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी सन्मान स्वीकारला.त्यानंतर दिवसभर बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांनी सुध्दा डिजेच्या तालावर ठेका धरत आपला दिवस भराचा ताण कमी केला.