ठाणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. शिवसेनेच्या दोन्ही गटांमुळे यात कमालीची भर पडली. यात बाळासाहेबांची शिवसेनेला (शिंदे गट) ५६ जागा तर शिवसेनेला (ठाकरे गट) ४४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. याशिवाय महाविकास आघाडीला २५ आणि भाजपाला १९ तर इतरांनी नऊ जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली असता त्यात १८ बिनविरोध विजयी झाल्या. तर बहिष्कार असल्यामुळे नवी मुंबईच्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या नाही. उर्वरित १३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार झाल्या असता त्याची मतमोजणी आज पार पडली. या ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यातील ४५९ मतदान केंद्रांवर ७९.५४ टक्के मतदान झाले असता त्याची आज मतमोजणी झाली. जिल्ह्याभरातील ११९ सरपंच पदासाठी व ८५५ सदस्यांसाठी एक लाख ९० हजार ६४७ जणांनी मतदान करून आपला उमेदवार विजयी केला. यासाठी जिल्ह्यात तीन हजार १५५ उमेदवार होते.
मतदान होऊन विजयी झालेल्या व बिनविरोध निवड झालेल्या आदी १५३ ग्राम पंचायतींवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कमी अधीक दावा केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी ५६ ग्राम पंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला. यामध्ये त्यांनी शहापूरला २९ तर मुरबाडला १५ आणि भिवंडीला श्रमजीवीला सोबत घेऊन १३ जागांवर विजय मिळवल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रमाणेच भिवंडी, शहापूरला शिवसेनेच्या ठाकरे गटाला ४४ लागा मिळवता आल्याचे दिसून येत आहे. तर मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथच्या एका ग्राम पंचायतीसह भाजपाला १९ जागा मिळाल्याचा आंदाज आहे. याविषयी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना विचारणा केली निकालाची आकडेवारी पूर्णपणे हाती आली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. महाविकास आघाडीला २५ ग्राम पंचायती मिळाल्या असून यामध्ये शहापूर आणि कल्याण येथील ग्राम पंचायतीचा समावेश आहे. भिवंडीत मनसेला दोन जागा मिळाल्याचे आढळून आले. उर्वरित नऊ ग्राम पंचायतींवर इतरांचे वर्चस्व असल्याचे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.