- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार कपिल पाटील यांना भाजपने केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन ठाणे जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी पाटील यांचा पराभव करून भाजपचे मनसुबे उधळून लावले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांवर महायुतीचे प्राबल्य असून, एक मतदारसंघ समाजवादी पार्टीकडे आहे. सपा आता महाविकास आघाडीत सामील झाली आहे. त्यामुळे पाटील यांच्या पराभवानंतर महायुतीचे येथील प्राबल्य किती व कसे टिकून राहते आणि बाळ्यामामा महाविकास आघाडीला किती यश मिळवून देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पाटील विरुद्ध मुरबाडमधील आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षामुळे महायुतीमधील दुभंग येथे लोकसभेत दिसला होता. त्यामुळे लोकसभेतील कटुता, संघर्ष विधानसभा निवडणुकीत दिसणे अपरिहार्य आहे.
भिवंडी पूर्व : २००९ ते २०१९ या काळात या मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांचा समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी पराभव केला. सध्या या मतदारसंघावर समाजवादीचे वर्चस्व आहे. म्हात्रे हे उद्धवसेनेतून मतदारसंघावर दावा करत आहेत. मनसेचे मनोज गुळवी यांनी मोर्चेबांधणी केली असून भाजपतर्फे माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि सुमित पाटील लढण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे.
भिवंडी पश्चिम : भाजपचे वर्चस्व आहे. महेश चौघुले हे दोनवेळा विजयी झाले. काँग्रेसकडून माजी महापौर विलास पाटील, शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी नगरसेवक तलाह मोमीन समाजवादीकडून रियाज आझमी ही नावे चर्चेत आहेत. भिवंडी ग्रामीण : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून शिंदेसेनेचे शांताराम मोरे दोनवेळा निवडून आले. मात्र, यावेळी उद्धवसेनेचे कडवे आव्हान असणार असून महादेव घाटाळ यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
कल्याण पश्चिम : या मतदारसंघावर शिंदेसेनेचे वर्चस्व असून, विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पवार, तसेच उद्धवसेना आणि मनसेने उमेदवारांसाठी कंबर कसली आहे.
शहापूर : मतदारसंघावर अजित पवार गटाचे वर्चस्व असून मतदारसंघात दौलत दरोडा आमदार आहेत. दरोडा यांना शरद पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे आव्हान असणार आहे.
मुरबाड : या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून किसन कथोरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदेसेनेचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मोर्चेबांधणी केली असून शरद पवार गटाने देखील मोर्चेबांधणी केली आहे.