उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी प्रभाग समिती क्रं-१ व २ च्या सहायक आयुक्त पदी प्राजक्ता कुलकर्णी व जेठानंद यांची नियुक्ती केली आहे. तर जनसंपर्क अधिकारी पदाचा पदभार छाया डांगळे यांच्याकडे दिला असून प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडे महापालिका सचिव पदाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत असल्याने, एकच खळबळ उडाली. गेल्या आठवड्यात प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यासह ३ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना रंगेहात अटक केली. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी सायंकाळी प्रभाग क्रं-१ व २ च्या सहायक आयुक्त पदी महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी तर कर विभागातील जेठानंद यांची नियुक्ती केली. तसेच जनसंपर्क अधिकारी पदाचा पदभार छाया डांगळे यांच्याकडे देण्यात आला.
महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांची प्रभाग समिती क्रं-१ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केल्यावर, महापालिका सचिव पदाचा पदभार उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडे दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी महापालिका सचिव पद प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडे कायम ठेवले. महापालिका सचिव पदी असणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पद होते. जनसंपर्क पदी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत आयुक्तांनी कौतुक केले आहे. प्रभाग समिती क्रं-१ च्या सहायक आयुक्त पदी प्राजक्ता कुलकर्णी यांच्या नियुक्तीनंतर सर्रासपणे उभे राहिलेले अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. तर जेठानंद यांच्या प्रभाग समिती क्रं-२ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्तीला सर्वस्तरातून विरोध सुरू झाला आहे. त्यांच्याकडे मालमत्ता कर विभागाचे कर निर्धारक हे महत्वाचे पद असतानाही मालमत्ता कर वसुली करण्यात त्यांना अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.